शाळेत छोट्या गटाच्या पालकांसाठी दरवर्षी एक उपयुक्त आणि आनंददायी कार्यशाळा आयोजित केली जाते. या कार्यशाळेचा उद्देश पालकांना मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच, शाळेची पद्धती आणि त्यामागील उद्दिष्ट शाळेच्या नव्या पालकांना समजावीत हाही असतो. यावर्षी ही कार्यशाळा २ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडली.
कार्यशाळेची सुरुवात उत्साही अभिनयगीताने झाली, ज्यात पालकांनी आनंदाने सहभाग घेऊन वातावरण उत्साही केले.
यानंतर शिक्षकांनी आत्तापर्यंत वर्गात घेतलेल्या प्रकल्प विषयाबद्दल माहिती दिली. त्यामध्ये मुलांबरोबर झालेल्या गप्पा, मुलांचे आलेले प्रतिसाद पालकांपर्यंत पोहोचवले. वर्गातील काही उपक्रमाबद्दल माहिती दिली. उदा. हवामान तक्ता कसा तयार केला जातो आणि तो मुलांच्या निरीक्षणशक्ती व तर्कशक्ती विकसित करण्यात कसा मदत करतो.
त्यानंतर पालकांना गटांमध्ये विभागून मुलं शाळेत करतात त्या विविध सर्जनशील कृती करून पाहण्याची संधी देण्यात आली. मुक्तचित्र काढणे, मातीकामातून वस्तू तयार करणे, तसेच विविध साधनांच्या सहाय्याने रचना करणे अशा कृतींमध्ये पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या सर्जनशील कृतींमध्ये तयार झालेल्या पालकांच्या कलाकृतींमधून त्यांच्या मनात दडलेल्या भावना, विचार आणि अनुभव सुंदरपणे व्यक्त झाले. यावरून सर्जनशीलतेचा वापर केल्याने भावना व्यक्त होतात आणि मन हलके होते, हे अधोरेखित झाले. अशाच प्रकारे मुलांच्या भावनांचाही निचरा होण्यासाठी अशा कृती मोठी मदत करतात, हे पालकांना प्रत्यक्ष जाणवले.
याचबरोबर अंकुरती साक्षरता (Emergent Literacy) या संकल्पनेबद्दलही पालकांना माहिती देण्यात आली, ज्यातून लहान मुलांमध्ये भाषिक विकास कसा घडतो आणि त्यांना वाचन-लेखनाची गोडी कशी लागते हे स्पष्ट करण्यात आले.
यानंतर मुलांच्या वेगवेगळ्या गरजा आणि त्याचा त्यांच्या वर्तनावर होणारा परिणाम या विषयावर बोलणे झाले. यात मुलांच्या शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक गरजा पूर्ण झाल्यास मुलांमध्ये सकारात्मक आत्मविश्वास व शिकण्याची आवड कशी वाढते, तसेच गरजा अपूर्ण राहिल्यास चिडचिड, अलिप्तपणा किंवा लक्ष विचलित होणे यांसारखे वर्तन कसे दिसून येते यावर पालकांशी चर्चा झाली.
कार्यशाळेच्या शेवटी पालकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली गेली. पालकांनी हा अनुभव अतिशय आनंददायी, उपयुक्त आणि संस्मरणीय असल्याचे सांगितले.
पालक, शिक्षक आणि शाळा यांच्यातील नाते दृढ करणारी ही कार्यशाळा सर्वार्थाने यशस्वी ठरली. यामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ झाले.