अक्षरनंदन शाळेमध्ये आठवीच्या वर्गाकरिता कार्यशाळा हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमामध्ये मुलांना सुतारकाम इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक या तीन गोष्टींमधील प्राथमिक कौशल्यांची ओळख करून दिली जाते. शाळेचा माजी विद्यार्थी अन्वय परळीकर (2023 बॅच) याला सुतारकामाची आवड असल्याने शाळेतल्या सुतार कामाच्या शिक्षणाचा काळ संपल्यानंतरही त्याने स्वतः घरी सुतारकामातून वस्तू बनवण्याचा छंद जोपासला. यंदा जून महिन्यात त्याने शाळेतल्या आठवीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी सुतारकामाची कार्यशाळा घेतली. ही तीन दिवसांची कार्यशाळा सुतारकामातील मूलभूत कौशल्य शिकलेल्या मुलांसाठी होती. या कार्यशाळेत वस्तू ठरवून त्यासाठी माप ठरवणे,लाकडावर खुणा करणे, लाकूड घासणे, कापणे, कापलेले भाग एकमेकास जोडणे या प्रक्रियेतून मुलांनी लाकडी खुर्ची तयार केली.