गेल्या दोन तीन महिन्यात तिसरी ते नववीची मुलं विविध सहली / अभ्यास शिबिरांना जाऊन आली.
मुलांच्या अभ्यास विषयांना जोडून सहली / शिबिरांची जागा ठरवली जाते. भूगोलाला जोडून नकाशा समजून घेणे, भूरुपे प्रत्यक्ष बघणे, छोटे किंवा मोठे उद्योग कसे चालतात ते प्रत्यक्ष बघणे, इतिहासाला जोडून गड किल्ले चढण्याचा अनुभव घेणे, तेथील ऐतिहासिक वास्तू प्रत्यक्ष बघणे, नागरिकशास्त्राला जोडून गाव, तालुका, ग्रामपंचायतीचे कामकाज समजून घेणे, सरपंचांची मुलाखत घेणे, गावातील शाळा बघणे, काही सामाजिक संस्था समजून घेणे, विज्ञानाला जोडून प्राण्यांचे निरीक्षण, जंगलांना भेट, सेंद्रिय शेती, पक्षी, वृक्ष निरीक्षण असे विविध अनुभव मुलं घेतात. तिथे चाललेल्या कामकाजात प्रत्यक्ष सहभाग घेणे, तेथील मुलांशी, तिथे काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर देवाणघेवाण करणे, मुलाखत घेणे, गप्पा मारणे अशा स्वरूपात मुलांची शिबिरे पार पडतात.
यंदा
इयत्ता तिसरीची सहल जानेवारी महिन्यात विज्ञानाला जोडून कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि भूगोलाला जोडून कात्रज दूध डेअरी येथे गेली होती.
इयत्ता चौथीची एक सहल नोव्हेंबर महिन्यात इतिहासाला जोडून शिवनेरी किल्ला आणि भूगोलाला जोडून भूरूपे बघण्यासाठी नाणेघाट येथे गेली होती.
नंतर फेब्रुवारी महिन्यात कासारसाई आणि जांबे या गावांना गेली होती. तेथे मुलांनी ग्रामीण लोकजीवन समजून घेतले.
इयत्ता पाचवीची सहल भोर तालुक्यात मुदिता नावाच्या शेतावर गेली होती. सेंद्रिय शेती आणि परमा कल्चर पद्धतीच्या शेतीचा अनुभव मुलांनी घेतला.
इयत्ता सहावीची सहल फलटण जिल्ह्यात विंचुर्णी येथे गेली. तिथे दुष्काळी भागात फुललेल्या सेंद्रिय शेतात काम करण्याचा अनुभव मुलांनी घेतला. तसेच फलटण येथील कमला निंबकर बालभवन या मित्र शाळेला मुलांनी भेट दिली.
इयत्ता सातवीची मुलं शिवाजी महाराजांच्या इतिहासाला जोडून प्रतापगड आणि रायगड येथे जाऊन आली.
इयत्ता आठवीच्या मुलांनी साने गुरूजी स्मारक ही सामाजिक संस्था समजून घेतली. तेथे रानात भटकंती आणि विविध टीम गेम्सचा अनुभव मुलांनी घेतला. आकार पॉट गॅलरी येथे मातीकामातून छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचा अनुभव मुलांनी घेतला.
इयत्ता नववीची सहल इतिहासाला जोडून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर येथे गेली होती. तसेच भूगोलाला जोडून तेथील पठारावरील सात रंगांची माती मुलांनी प्रत्यक्ष बघितली.
इयत्ता दहावीची सहल ऑक्टोबर महिन्यात भोर तालुक्यातील नंदघुर येथे गेली होती. तिथे मुलांनी बांबू सेतू प्रकल्प समजून घेतला. बांबूच्या छोट्या वस्तू बनवून बघितल्या आणि तेथील ग्रामीण लोकजीवनही समजून घेतले.