19 जानेवारी 2025 रोजी आठवीची दुकानजत्रा रंगली. दुकानजत्रेसाठी विक्री-योग्य, सुबक व आकर्षक वस्तू तयार करणे, तोंडी हिशोब करणे, जमाखर्च आणि नफा तोटा यांचे भान येणे, गटकाम शिकणे, ग्राहकांशी परिणामकारक संवाद साधता येणे, खऱ्या खुऱ्या विक्रीचा अनुभव घेणे अशा अनेक गोष्टी मुलं दुकानजत्रेच्या निमित्ताने शिकतात.
यंदा बांधणीचे स्टोल्स, स्क्रंची, कापडी कव्हर घातलेल्या वह्या, लाकडाचे मोबाईल स्टँड, लाकडाचे रायटिंग पॅड, फ्रीज मॅग्नेट, किचेन, पेंडंट, नाईटलँप, ठसेकाम करून केलेल्या पिशव्या, पाकिटे यांसारख्या वस्तू तर साबुदाण्याची खिचडी, पावभाजी, मुखवास, कॉर्नचाट, कॉफी, गाजर हलवा असे पदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते. तसेच चॉकलेट्स, दाण्याची चटणी, बिस्कीटे, खारे शंकरपाळे इत्यादी पदार्थ व ब्रेसलेट मुलांनी घरून करून आणून विक्रीस ठेवले होते.
दुकानजत्रेचा आनंद लुटण्यासाठी सातवी ते दहावी या वर्गांतील मुलांचे पालक, सातवी, नववी आणि दहावीत शिकणारी मुले, काही माजी विद्यार्थी आणि शाळेशी निगडित व्यक्ती उपस्थित होत्या.
विक्रीची वेळ संपल्यानंतर आपापल्या स्टॉलचा हिशोब करण्याचे कामही मुलांनी अचूकपणे केले. एकंदर, यंदाची दुकानजत्रा मोठ्या उत्साहात पार पडली.