पालकांचे अभिप्राय


शाळेविषयी काही आजी माजी पालकांचे अभिप्राय

सातवी पालक, २०२४-२५

शाळा ही केवळ ज्ञान देणारी किंवा मुलांना घडवणारी संस्था नसते तर ती एक विचार रुजवणारी, आपलं, पर्यायाने देशाचं भविष्य पेरणारी संस्था असते. अशावेळी ही संस्था जितकी सजग, समकालीन आणि सशक्त असेल तितकं आपलं समाज म्हणून असणं, वाढणं आणि बहरणं अधिकाधिक आरोग्यपूर्ण असतं.
अक्षरनंदन ही अशीच एक संस्था. माझी मुलगी या शाळेत आल्यापासून पालक म्हणूनच नाही तर व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून मी स्वतःला अनेकदा निरखलं आहे. मुलगी क्रमिक अभ्यासक्रमात कशी आहे यापेक्षा ती एक व्यक्ती म्हणून सहृदय, सुजाण आणि सर्जनशील आहे का याला या शाळेत अधिक महत्त्व दिलं जातं ही मला या शाळेबद्दल सर्वाधिक आवडणारी गोष्ट.
या शाळेत का घालावं याची शेकडो कारणं देता येतील, पण या शाळेत का घालू नये याचं एकही कारण मला आठवत नाहीये. साहित्य मुलांपर्यंत पोचवू पाहणारी एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून आणि मुख्य म्हणजे एक बाप म्हणून कायम या शाळेच्या ऋणात राहणे पसंत करेन.

माजी पालक, २०२१-२२

अक्षरनंदन शाळेतील दोन माजी विद्यार्थ्यांचे आम्ही पालक. ह्या शाळेत मुलं शिकत असतानाचा काळ त्यांच्यासाठी आनंदाचा तर होताच पण आम्ही पालक आणि शाळा यांचं नातंही अगदी खास होऊन गेलं. शाळेमुळे आम्हालाही खूप पालक मित्र मैत्रिणी मिळाले.
मराठी माध्यमातून शिकवणारी ही शाळा प्रयोगशील आहे. शिकणं आणि शिकवणं नैसर्गिक, आनंददायी आणि सहज असेल याकडे शाळेचा कटाक्ष असतो. फक्त मुलंच नाही तर अनेक वर्षांचा अनुभव असलेले इथले ताई दादाही सतत काहीतरी नवीन शिकताना दिसतात. स्नेहसंमेलन, वर्षोत्सव, दुकानजत्रा, हिंदी - इंग्रजी दिवस, सहली, शिबिरं, स्वच्छता, स्वकमाई, क्रीडादिन, देशाच्या वेगवेगळ्या भागातून आणि कधी परदेशातूनही आलेल्या लेखक, कार्यकर्ती मंडळी आणि लहान मुलं यांच्यासोबतच्या मनमोकळ्या गप्पा असे अनेक अनेक उपक्रम शाळेत सतत चालू असतात.
लहान वयातच मुलांना वेगवेगळ्या स्पर्धांसाठी तयार करत असल्याचे काही शाळा अभिमानाने मिरवत असताना ह्या शाळेने मात्र जाणीवपूर्वक वेगळीच वाट चोखाळली आहे. कसं शिकावं हे शिकायला ही शाळा मुलांना मदत करतेच पण त्या बरोबरच आपण जे शिकतोय त्याचा विवेकाने वापर कसा करता येईल याची जाणीवही करून देते. सर्वसमावेशकता हे तर ह्या शाळेचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यातील फरक मुलांनी ओळखावा, लादलेल्या नियमांपेक्षा स्वयंप्रेरणेने स्वतःला शिस्त लावून घ्यावी यावरही शाळेचा भर असतो. यामुळेच आज शाळेचा टप्पा पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी खूप वेगवेगळ्या गोष्टी करू पाहत आहेत.
तीस वर्षांहून जास्त काळ अंतरीचे कोवळेपण हरवू न देता फोफावलेल्या शाळेला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

सहावी पालक, २०२४-२५

आम्हाला अक्षरनंदनचे पालक बनून आता ७ वर्ष झाली. थोडक्यात सुरवातीपासून आत्तापर्यंत आम्ही किमान ७ वेगवेगळ्या वर्गात पालक बैठकांना बसलो आहोत, ७ वेगवेगळ्या वर्गताईंसोबत मुलाच्या शैक्षणिक आणि इतर प्रगतीवर (!) चर्चा केली आहे आणि ७ मूल्यमापन प्रक्रियांमध्ये सहभागी झालो आहोत. इतरही सर्व ताईंसोबत काही न काही कारणांनी आमचा संपर्क येत असतो. या अनुभवाच्या शिदोरीवर हा अभिप्राय लिहीत आहे.
अक्षरनंदन शाळा ही अशा काही निवडक शाळांपैकी एक आहे जी प्रवेश घेताना जे सांगते त्याचे तंतोतंत पालन करते. शाळेची स्वतःची भूमिका, राजकीय-धार्मिक-आर्थिक बाबींमधील शाळेचे म्हणणे, सरकारी नियमांबाबतची दक्षता या व अशा अनेक बाबी खूप स्पष्टपणे पाळल्या जातात. शिकावताना फक्त पाठयपुस्तकाचा वापर न करता राज्य शैक्षणिक धोरणे, अध्ययन निष्पत्ती आणि इतर अनेक संबंधित आणि सहाय्यक गोष्टींचा आधार घेऊन शिकवले जाते. विषयाला धरून मुलांना ते स्वतः करू शकतील असे उपक्रम दिले जातात. बऱ्याचदा आम्हा पालकांना प्रथमदर्शनी एखादी कृती कशासाठी घेतलेली आहे हे समजत देखील नाही, पण ताईंशी चर्चा केली की त्या मागचा शैक्षणिक दृष्टिकोन समजतो.
एखादी संस्था जेव्हा एखादा कार्यक्रम करते तेव्हा तिची एकूण वैचारिक भूमिका, त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या वेळी दिसत असते. शाळेची अशा कार्यक्रमांच्या वेळी तयारी करतानाची जागरूकता खूप प्रेरणादायी असते. लहान लहान गोष्टी- संमेलनाच्या वेळी प्रॉप्स तयार करताना आधीच्या गोष्टी नव्याने कशा वापरता येतील, डिंक किती व कसा लावला पाहिजे, कमीत कमी नवीन गोष्टी विकत आणून साजेसे प्रॉप्स कसे बनवता येतील ह्या गोष्टी शाळेकडून, शिक्षकांकडून पाळल्या जातात आणि पालकांना देखील तितक्याच पोटतिडीकीने सांगितल्या जातात. यामधून वर वर जरी पैसे वाचवण्याचा प्रयत्न दिसत असला तरी यामागे एक वैचारिक भूमिका आहे, हेतू आहे. संमेलनामध्ये नवीन कपडे न आणायला लावता एकमेकांकडून घेऊन रंगसंगती बनवायची हे याचेच एक उदाहरण.
अगदी छोट्या गटापासून मुलांना त्यांना स्वतःला काय वाटतं, त्यांचं म्हणणं काय आहे हे मोकळेपणाने सांगता येतं. मुलांना काय विचार करायचा हे न सांगता कसा विचार करायचा ते शिकवणारी, दाखवून देणारी अशी ही शाळा आहे.
आम्ही शाळेत प्रवेश घेताना आमच्या मुलाने पुढे जाऊन काय करावं, काय केलं पाहिजे याविषयी आमच्या काही विशिष्ट अपेक्षा नव्हत्या, आजही नाहीत. परंतु तो जे काही करेल ते स्वतः ठरवण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होईल आणि कुठलीही गोष्ट/काम तो आनंदाने करेल अशी आमची इच्छा आहे. यादृष्टीने त्याचा शाळेचा आत्तापर्यंतचा प्रवास बघून आम्ही अत्यंत समाधानी आहोत.

दहावी पालक, २०२४-२५

इंग्रजीचा अट्टाहास न करता परिसर भाषेत मुलाचं शिक्षण व्हावं आणि त्याला त्याच्या कलाने शिकता यावं, हे साधे हेतू मनात ठेवून आम्ही पहिल्या पाल्याचा प्रवेश अक्षरनंदनमध्ये घेतला होता. या दोन्हींबाबतीत आमचा पालक म्हणून अनुभव सकारात्मक आहेच. पण याशिवायही कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी आमच्या मुलांना मिळत आहेत हे या प्रवासात लक्षात येतंय.
रवींद्रनाथांचं शांतीनिकेतन आणि तोत्तोचानच्या कोबायाशी सरांची तोमोई या शाळांची झलक या शाळेत दिसते. मुलांना समजून घेऊन, त्यांची निरागसता जपत त्यांच्या सर्वांगीण (शैक्षणिक, मानसिक, सामाजिक) प्रगतीसाठी झटणारे शिक्षक इथे भेटतात. सगळ्यांना सामावून घेऊन पुढे जाण्याची, एक चांगलं माणूस होण्याची तालीम इथे मिळते - मुलांना आणि पालकांनासुद्धा!
शाळेची शिक्षणपद्धती लोकशाही मूल्यांचा आदर करणारी आहे. ही मूल्यं केवळ शिकवली जात नाहीत, तर वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुलांमध्ये रूजवली जातात. स्वतःचं मत मांडणं, गटाच्या निर्णयाचा आदर करणं, सोबत काम करताना एकमेकांच्या खुबी ओळखून उद्दिष्टं गाठणं हे मुलं सहज करू शकतात.
निसर्गावर प्रेम करायला मुलं शिकतात ते फक्त परिसराच्या तासाला नाही बरं का! बहाव्याचं फुललेलं झाड पहायची भेट, मराठीचा कविता प्रकल्प, नवीन खरेदी न करता केलेलं संमेलन, मुलांची शाळेतली छोटीशी शेती, प्लास्टिक किंवा कुठलाही इतर कचरा न करणाऱ्या अभ्यास सहली अश्या वेगवेगळ्या मार्गांनी ते ठसत जातं.
भविष्यासाठी सजग आणि सक्षम नागरिकांची एक पिढीच आमची शाळा तयार करत आहे. हो, "आमची". कारण, मुलांची लाडकी असलेली अक्षर नंदन शाळा आम्हा आई-बाबांचीसुद्धा कधी आवडती झाली हे कळलंच नाही.

पाचवी पालक, २०२४-२५

'चित्त जेथे असेल भयशून्य', जिथे फक्त मुलंच नाहीत तर शिक्षक व पालकांसाठीही 'शिकतं' राहण्यासाठी, घडण्यासाठी प्रोत्साहन मिळते अशी आपली शाळा आहे.  आपली शाळा विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या पलीकडे जाऊन, सहयोग शिकवते, स्वातंत्र्याचा मुक्त अनुभव देते, तसेच स्वयंशिस्तीची चौकट आत्मसात करण्यास प्रेरित करते. 
अनेक शास्त्रीय अभ्यास असे सांगतात की जागतिक हवामान बदल आणि पर्यावरणाची स्थिती बघता येणारा काळ हा अतिशय अनिश्चिततेचा असणार आहे. त्यामुळे हा काळ सृजनशीलता, प्रयोगशीलता, स्वतःचे विचार आणि त्याचबरोबर अनुकूलनशीलता, संवाद कौशल्य आणि सहानुभूती या गुणांची गरज असणारा असेल.
हे सर्व गुण विविध उपक्रमांतून, शिकवण्याच्या अभिनव पद्धतींतून रुजवण्याचा प्रयत्न शाळा करत असते. शाळेच्या वर्गा-वर्गातील रोजच्या व्यवहारातून लोकशाही मूल्यांचे आचरण होत असताना दिसते.
मुलांना (आपल्याला हवा तसा आकार देण्यासाठी) मातीचा गोळा न मानता, एखाद्या 'रोपाच्या बी' समान मानणं हे आपल्या शाळेचे वैशिष्ट्य मला महत्त्वाचे वाटते. हे रोप रुजून मोठे होताना, रोपाच्या गरजे नुसार, योग्य तितके खत-पाणी घालणे हे कार्य शिक्षक मनोभावे करताना दिसतात. उद्या या साऱ्यांचे विविध फुलोऱ्याने नटलेले वृक्ष होवोत आणि संपूर्ण विश्वाला प्रेम, आनंद, सृजनशीलतेची शीतल छाया देवोत!

माजी पालक, २०२१-२२

A school they say is a child’s second home. And what can be a better home than ‘Aksharnandan’? Starting from simple things like a timetable that is mindful of the child’s sleep schedule, to uniforms that allow comfort and play for both boys and girls, to learning that is rooted in not just the mother tongue, but the child’s natural environment and cultural roots, to celebrating our country’s rich diversity through songs and poems from various regions (and the list can go on), the school offers a perfect setting for young minds to thrive. The emphasis is not just on academics, but on inculcating a civic sense, and an environmental responsibility, which to my mind are more important than any degree.