इयत्ता पहिली-दुसरी सहल
फेब्रुवारी महिन्यात पहिली व दुसरीची सहल पर्वतीवर गेली होती. ८.३० वाजता मुलांनी टेकडी चढायला सुरुवात केली. वर फेरफटका मारून माहिती छान समजून घेतली. मोकळ्या जागेत मुले मनसोक्त खेळली. एकत्र डबा खात, गप्पा मारत मुलांनी सहलीचा आनंद घेतला.
इयत्ता तिसरी सहल
या सत्रात तिसरीची सहल मॉडेल कॉलनी येथील ‘ल का कि’ तळे येथे गेली होती. पाणथळ जागेतील व इतर पक्षी, मासे, वनस्पती यांचे मुलांनी निरीक्षण केले. तिथेच मिळालेल्या फांद्या, पाने , काटक्या यांच्या मदतीने मुलांनी गटात घरटी बनवली. सकाळची शांत वेळ, पक्षांच्या हालचाली, आवाज यांचा अनुभव मुलांना घेता आला.
इयत्ता चौथी शिवनेरी नाणेघाट सहल
चौथीच्या टप्प्यावर मुले शिवाजी महाराजांचा इतिहास शिकतात. त्याला जोडून, शिवाजी महाराजांचा जन्म जिथे झाला तिथली वास्तू बघणे, प्रत्यक्ष ठिकाण बघून इतिहास समजून घेणे यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मुले शिवनेरी-नाणेघाट सहलीला गेली. गड पाहताना मुले इतिहासात तर रमलीच त्याचबरोबर भूगोल, किल्ल्याची रचना आणि बांधकाम देखील समजून घेतले. भौगोलिक रचना समजून घेण्यासाठी मुलांनी नाणेघाट पाहिला. या सहलीची काही क्षणचित्रे !!
इयत्ता चौथी ग्रामीण लोकजीवन सहल
यावर्षी चौथीच्या मुलांनी पुण्याजवळील डोणे गाव व नेऱ्हे गाव अशा दोन गावांना भेट देऊन ग्रामीण लोकजीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला. गाव ते शहर हा बदल कसा होतो हे मुलांनी सर्व अंगांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा अनुभव मुलांसाठी अतिशय अंतर्मुख करणारा ठरतो. या सहलीची काही क्षणचित्रे !!
इयत्ता पाचवी निवासी शिबीर: मुदिता फार्म
भोर तालुक्यातील मुदिता फार्मवर पाचवीच्या मुलांचे निवासी शिबीर झाले. सेंद्रिय शेती आणि परमा कल्चर पद्धतीच्या शेतीचा अनुभव मुलांनी घेतला.तेथील ग्रामीण जीवन, गावात चालणारे कुटीर उद्योग मुलांनी बघितले. ते चालवणाऱ्या व्यक्तींशी गप्पा मारल्या. अभ्यास सहली दरम्यान मुलांनी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत गप्पा मारत, खेळ खेळत शिबिराची मनापासून मजा घेतली. या सहलीची काही क्षणचित्रे!!
इयत्ता सहावी विंचुर्णी सहल
विज्ञान, भूगोल अशा विषयांना धरून सेंद्रिय शेती बघणे, शेतात काम करणे, शेतीपूरक व्यवसायांची माहिती घेणे या उद्देशाने दरवर्षी सहावीची मुले फलटण जवळ विंचुर्णी या गावी 3 दिवसांच्या सहलीसाठी जातात. बाबूलाल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर 3 दिवस राहून मुलांनी त्यांनी केलेले पाण्याचे, जमिनीचे व्यवस्थापन समजून घेतले. जीवामृत, दशपर्णी अर्क, गांडूळ खत याबद्दल माहिती घेतली. दशपर्णी अर्क बनवला. फलटण मधील कमला निंबकर बालभवनच्या सहावीच्या मुलांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर मैत्री केली, कार्यानुभवाची कृती केली. या सहलीची काही क्षणचित्रे !!
इयत्ता आठवी कारखाना भेट
दुकानजत्रेनंतरचा पुढचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष कारखान्यात वस्तू तयार होताना पाहणे. तसेच कच्चा माल, त्यावर होणाऱ्या प्रक्रिया इत्यादी गोष्टींची माहिती करून घेणे. यासाठी ही कारखाना भेट ठरवली होती. मुलांनी एकूण ४ कारखान्यांना भेटी दिल्या. सर्व माहिती नीट समजून घेतली.
अक्षरनंदन शिक्षक सहल
प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतरमंडळी यांची यावर्षीची सहल रायगड जिल्ह्यातील इंदापूर इथल्या ‘आकार पॉट गॅलरी’ येथे गेली होती. सर्व शिक्षकांनी या ठिकाणी ३ H च्या मदतीने (Hand-Heart-Head) मातीच्या वस्तू निर्मितीचा आनंद देखील घेतला. याचबरोबर मातीचे प्रकार, मातीची भांडी बनवण्याची प्रक्रिया समजून घेतल्या. या सहलीची काही खास क्षणचित्रे !!
इयत्ता पहिली-दुसरी सहल
इयत्ता तिसरी सहल
इयत्ता चौथी शिवनेरी नाणेघाट सहल
इयत्ता पाचवी निवासी शिबीर: मुदिता फार्म
इयत्ता सहावी विंचुर्णी सहल
इयत्ता आठवी कारखाना भेट
अक्षरनंदन शिक्षक सहल