इयत्ता पहिलीत परिसर विषयात वनस्पती विषयाला धरून दर वर्षी प्रमाणे याही वर्षी बियांचे प्रदर्शन भरवले होते. मुलांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आणल्या. रंग, आकार, स्पर्श, बी कशाची आहे, तिचा उपयोग काय अशा विविध मुद्द्यांना धरून मुलांनी वर्गासमोर छान माहिती सांगितली. ताईंनी बियांचे वर्गीकरण करून प्रदर्शनाची मांडणी केली. मुलांनी घरी स्वतः पेरणी करून लावलेले रोपही या प्रदर्शनात ठेवले होते. मुलांची निसर्गाशी जवळीक वाढावी , छोट्या बीतून मोठं झाड, त्याची पानं, फुलं, फळं आणि परत त्यातून मिळणाऱ्या बिया हे चक्र मुलांना समजावे हा हेतू या उपक्रमातून छान साध्य होतो आहे असं जाणवलं. शाळेतही मुलांनी मेथीच्या बिया पेरल्या, त्यांना रोज पाणी घातले, निरीक्षण केले. १५ दिवसांनी ह्या स्वतः उगवलेल्या मेथीची शाळेच्या स्वयंपाक घरात कोशिंबीर बनवली. शेतीची कामे, स्वयंपाक घरातील कामे, विविध साधने, अवजारे, त्यांच्याशी जोडलेले वेगवेगळे शब्द मुलांना माहीत झाले.