पालक कृतज्ञता दिवस

शाळेतील तीन विभागांमध्ये वर्षभरात अनेक उपक्रम राबवले जातात. सहली, शिबिरं, संमेलन, दुकानजत्रा, विज्ञान कार्यशाळा, मागे पडणाऱ्या मुलांचा अभ्यास आणि असे अनेक उपक्रम राबवण्यासाठी भरपूर मनुष्यबळाची गरज भासते. अक्षरनंदनचा उत्साही पालकवर्ग एका हाकेसरशी हे उपक्रम तडीस नेण्यास मदतीला येतो. पालक, दिवसच्या दिवस या उपक्रमाच्या तयारीसाठी शाळेत येऊन मुलांबरोबर काम करतात.
काही उत्साही पालकांनी शाळेतील मुलं, पालक व शिक्षकांसाठी मॅरेथॉनचे आयोजन केलं होतं. एका पालकांच्या गटाने पालक व शिक्षकांसाठी ‘शोधा म्हणजे सापडेल’ अशी स्पर्धा आयोजित केली होती. अशा या उत्साही, मदतीस तत्पर पालकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी 23 मार्च 2024 रोजी शाळेत कृतज्ञता समारंभाचे आयोजन केले होते.
हस्तकलेच्या वस्तू करणे ही एक निखळ आनंद देणारी गोष्ट आहे. सगळ्या वर्गांचे आमंत्रित पालक गटात बसून एकमेकांबरोबर गप्पागोष्टी, चेष्टा मस्करी करत कोलाज करण्यात रमून गेले होते. अल्पोपहार करून स्वतः बनवलेली मार्बल प्रिंटची प्रत घेऊन पालक खुशीत घरी गेले.