प्लास्टिक संकलनातून पर्यावरण संवर्धनाची शिकवण!

पर्यावरणाची काळजी घेण्याची सुरुवात आपल्या घरापासून होते असा अक्षरनंदन शाळेचा विश्वास आहे. याच विचारातून शाळेत ‘सागर मित्र’ या संस्थेच्या सहकार्याने दर महिन्याला ठरावीक दिवशी प्लास्टिक संकलनाचा उपक्रम राबवला जातो. या दिवशी विद्यार्थी आपल्या घरातील कोरडे प्लास्टिक शाळेत आणून जमा करतात. विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग असतो. संकलित केलेले प्लास्टिक सागर मित्र संस्थेच्या समन्वयातून रिसायकलिंगसाठी पाठवले जाते.

 

प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन,  रिसायकलिंगचे महत्त्व आणि पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी यांविषयी मुलांशी सातत्याने संवाद साधला जातो. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची जाणीव वर्गाबाहेर पडून घरापर्यंत पोहोचते. मुलांसोबतच कुटुंबीयांनाही पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याची प्रेरणा मिळते.