8 वीच्या वर्गातील मुलांची सहल 26 जुलै शनिवार या दिवशी “फुलेवाडा” येथे गेली होती. यामध्ये वर्गातील सर्व मुले सहभागी झाली होती. पालकांच्या सहकार्याने व दादा व ताईंच्या मार्गदर्शनाखाली हीं सहल गेली होती. सहलीला जाण्याआधी मुलांना ‘डिसकव्हरी ऑफ इंडिया’ मधील ‘महात्मा फुलें’चा एपिसोड पाहायला सांगितला होता. मुलांनी तो एपिसोड पाहिल्यामुळे मुलांना बरीच माहिती मिळाली होती. तसेच बरेच प्रश्न देखील पडलेले होते. मुलांनी प्रत्यक्षात वाडा पाहताना तिथे असलेल्या वास्तूला इतिहासाचे साधन म्हणून त्याचे बारकाईने निरीक्षण केले. तिथे असलेली वास्तू, पत्रव्यवहार, फोटो या सर्व साधनांना इतिहासाची भौतिक, लिखित साधने या स्वरूपात पाहून मुलांनी सागर दादा व मेधा ताईंबरोबर चर्चा करून, बरेच प्रश्न विचारून माहिती घेतली. तसेच त्या काळी समाज कोणत्या पातळीवर होता? सामाजिक वास्तव कसे होते? अस्पृशांची काय अवस्था होती? फुले दा्मपत्याने त्यासाठी केलेला संघर्ष व या संघर्षात त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सहकारी या सर्व महत्वाच्या प्रश्नावर मुलांसोबत संवाद केला. मुलांनी सहलीचा आनंद घेतला व भरपूर सारी माहिती मिळवली.