इयत्ता सातवी : काव्यवाचन उपक्रम

मुलांमध्ये कवितेची आवड निर्माण व्हावी आणि विविध कवींच्या साहित्याची ओळख व्हावी, या उद्देशाने दरवर्षी इयत्ता सातवीसाठी काव्यवाचन उपक्रम आयोजित करण्यात येतो. शाळेच्या वाचनालयात विविध कवींच्या कवितांची पुस्तके ठेवण्यात आली.मुलांनी उत्सुकतेने पुस्तके चाळली आणि स्वतःच्या आवडीनुसार पाच कविता निवडल्या. त्यातून ताईंनी प्रत्येकी एका कवितेची निवड केली.

 

निवडलेल्या कवितेचा आशय समजून घेणे, योग्य शब्दोच्चार, आवाजातील चढ-उतार, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यांवर मुलांनी विशेष मेहनत घेतली. मित्रांसमोर सराव करताना एकमेकांना सूचना देणे आणि सुधारणा करून पाहणे, यातूनही त्यांनी शिकण्याचा आनंद घेतला. १ ऑगस्ट रोजी मुलांनी कवितांचे उत्तम सादरीकरण केले. या उपक्रमातून मुलांना केवळ कवितांचा आस्वाद घेता आला नाही, तर स्वतःच्या भावना शब्दांतून व्यक्त करण्याची आणि इतरांसमोर आत्मविश्वासाने उभे राहण्याची संधीही मिळाली.